टीआरपी वाढविण्यासाठीच माध्यमांचा एक्झिट पोलत; महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील

‘लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून, आता 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. 2004मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती; पण त्याच्या उलटे झाले होते. आताच्या निकालाबाबत सांगायचे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32 जागा मिळतील,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच ‘माध्यमांकडून जो एक्झिट पोल दिला जातो, त्यातून केवळ त्यांचा ‘टीआरपी’ वाढविण्यावर भर असतो. यातून फक्त लोकांची करमणूक होते. यामुळे एक्झिट पोलवर विश्वासार्हता राहत नाही,’ असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीनंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीला साधारणतः 32 जागा मिळतील, असा विश्वास असून, प्रत्यक्षात किती जागा मिळतील, हे येणाऱया 4 तारखेला समजेल,’ असे चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्य असतात. त्या निवड प्रक्रियेत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता अशी व्यवस्था होती. मात्र, याच वर्षाच्या सुरुवातीला ती व्यवस्था बदलून मोदींनी त्यातून सरन्यायाधीशांना काढून टाकत त्यामध्ये पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढीच पदे ठेवली. मग एकटा विरोधी पक्षनेता काय करणार?’ असे सांगत, ‘या व्यवस्थेतून त्यांनी दोन निवडणूक आयुक्त नेमले. ते कोणला फॉर राहणार, हे माहीत नाही. यामुळे आमचे सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू,’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मोदींनी शेतकऱयांवर सूड घेतला

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘देशातील तीन कृषी कायद्यांना शेतकऱयांनी विरोध केल्याचा राग मोदींनी काढला. यामुळे मोदींनी शेतकऱयांवर सूड घेण्याचे काम केले आहे.  निर्यातबंदी उठवून 40 टक्के निर्यातकर बसविल्याने शेतकऱयांची अवस्था बिकट झाली,’ असे चव्हाण यांनी सांगितले.

लोकांना निवडणूक आयोगावर शंका

‘निवडणूक आयोग हा निःपक्षपाती असायला हवा. लोकांच्या मनात ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची भूमिका यांवर शंका असल्याने लोकांनाच निवडणूक हातात घ्यावी लागली. काँग्रेसने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती; परंतु ती फेटाळण्यात आली. एकूणच, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे दाट धुके आहे,’ असे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.