‘माही’ च्या रणनीतीचा हिंदुस्थानला नक्कीच फायदा होईल – गौतम गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी टी-20 विश्वचषकामध्ये हिंदुस्थानी संघाचा मेन्टॉर म्हणून हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची नियुक्ती केली आहे. दबावामध्ये निर्माण होणारी परिस्थिती माही उत्तम प्रकारे हाताळतो. त्याच्या रणनीतीचा आणि अनुभवाचा हिंदुस्थानी संघाला आगामी टी-20 विश्वचषकात नक्कीच फायदा होईल, असे मत हिंदुस्थानचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या टी-20 विश्वचषकाच्या संघाची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली. पंधरा सदस्य संघाबरोबर बीसीसीआयने एक मोठी घोषणा करत हिंदुस्तानी संघाच्या मेन्टॉरपदी माहीची निवड केली. विराट, रवी शास्त्री यांच्या जोडीला माहीच्या अनुभवाची जोड मिळणार असल्याने त्याचा फायदा हिंदुस्थानी संघाला नक्कीच होईल. हे आगामी विश्वचषकासाठी हिंदुस्थानच्या संघात निवड करण्यात आलेले खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी करतील यात शंका नाही. त्यांच्याकडे मैदानावर उत्तम काम करण्याची सर्व कौशल्य आहेत. मात्र, जर दबावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कसे हाताळावे यासाठी माहीचा अनुभव फायद्याचा ठरू शकतो. माहीचा अनुभव आणि कठीण परिस्थितीत दबाव हाताळण्याची त्याची मानसिकता हे त्याला एक मार्गदर्शक म्हणून निवडण्यामागचे कारण असू शकते असे गंभीर म्हणाला.

गेल्या काही दशकांमध्ये हिंदुस्थानचा संघ महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरत आहे. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये हिंदुस्थानी संघ दडपणाखाली खेळताना दिसतो. त्याचा फटका संघाला सहन करावा लागतो. मात्र, आगामी टी-20 विश्वचषकात माही मेन्टॉर असल्याने त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकतो, असे गंभीर म्हणाला.