मखिजानी दांपत्याची हत्या, मोलकरीण आणि प्रियकरावर पोलिसांचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

खारमधल्या मखिजानी दांपत्याच्या हत्येमुळे मुंबई शहरात खळबळ उडाली आहे. या दांपत्याची ज्या पद्धतीने हत्या झाली ते बघितल्यानंतर घराची माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय होता. पोलिसांचा हा संशय खरा ठरला असून घरकाम करणाऱ्या महिलेने आणि तिच्या निरूद्योगी प्रियकरानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरकाम करणाऱ्या महिलेला आणि तिच्या बेरोजगार प्रियकराला पैशांची गरज होती. या दोघांनी मिळून मखिजानी यांचं घर लुटायचं ठरवलं. २० जून रोजी सगळं काम आवरून मोलकरीण हे दांपत्या केव्हा झोपी जातंय याची वाट बघत होती. दांपत्य झोपल्यानंतर तिने तिच्या प्रियकराला घरात बोलावून घेतलं. दोघं मिळून चोरी करत असताना नानक मखिजानी यांना जाग आली. ते जागे झालेले बघितल्यामुळे मोलकरीण आणि तिचा प्रियकर घाबरले. या दोघांनी नानक मखिजानी यांना मारण्याचं ठरवलं. प्रियकराने मखिजानी यांना मारल्यानंतर दया मखिजानी यांनाही ठार मारलं आणि दोघेही घरातून पळून गेले असं पोलिसांना वाटत आहे.

२१ जून रोजी सकाळी काम करणारी मोलकरीण मखिजानी यांच्या घरी आली होती. तिने बराच वेळ बेल वाजवल्यानंतरही दार न उघडल्याने शेजाऱ्यांना सावध केलं होतं. शेजारच्यांनीही मखिजानी यांची बेल वाजवली, दरवाजा ठोठावला मात्र दार उघडलं नाही. यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना फोन फिरवला. पोलिसांनी घटनेची पाहणी केल्यानंतर तपासाला सुरूवात केली असून ते या दुहेरी हत्याकांडानंतर पळून गेलेल्या मोलकरणीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.