
सामान्य माणसाच्या जीवनमानात सुलभता येण्यासाठी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि इतर संबंधित यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा विकास करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी, अशी सूचना पर्यावरण व पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली
महापालिका, सामान्य नागरिक, नियोजक, तज्ञ, बेस्ट उपक्रमामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधांची माहिती आणि फायदे या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ‘मुंबई इन ट्रान्झिट’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेचे उद्घान महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले व्हीसीद्वारे उपस्थित होते.
बदलांबाबत सातत्याने संवाद
मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांशी सकारात्मक बदलाबाबत सातत्याने संवाद साधला जाईल, जेणेकरून सामान्य मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘मुंबई इन ट्रान्झिट’ या कार्यशाळेत मेट्रो लाइन-2 ‘अ’ आणि 7 चा पश्चिम उपनगरांवर होणारा परिणाम, बहुवाहतूक एकात्मीकरण, अंतिम स्थान जोडणी, एकात्मिक तिकिटीचे सादरीकरण झाले.
चौदा मार्गिका
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्गाचा सुमारे 337.1 किलोमीटरचा (14 मार्गिका) बृहत् आराखडा तयार केला आहे, त्याची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीस मेट्रो बृहत् आराखडय़ामधील मेट्रो मार्ग-1 (वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर) या 11.80 कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. मेट्रो-2 ‘अ’ आणि 7चे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच टप्प्याटप्प्याने खुले करण्याचे नियोजन आहे. तसेच मेट्रो मार्ग-2 ‘ब’ 4, 4 ‘अ’, 5, 6, 7 अ आणि 9चे बांधकाम सुरू आहे. मेट्रो मार्ग 10, 11, 12 ची प्रत्यक्ष अंमलबजावणीची कामे लवकरच सुरू होणे अपेक्षित आहेत. मेट्रो मार्ग-8, 13 व 14 चे नियोजन प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मेट्रो-2 व 7 लवकरच खुली
मेट्रो 2 ‘अ’ आणि 7 लवकरच खुली करण्याचे नियोजन असल्याने या मार्गिकांची माहिती मुंबईकरांना व्हावी या दृष्टीने प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.



























































