
गुरूवारी सायंकाळी झालेल्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले असून शुक्रवारी धरणातून 1218 क्युसेसने 3 दरवाज्यातून पाणी सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दररोज आभाळ असलेले ढगाळ वातावरण असायचे, वातावरणात प्रचंड उकाडा असताना पाऊस मात्र हुलकावणी देत होता. दुसरीकडे माजलगाव तालुक्यात पाऊस समाधानकारक नसला तरी धरणांत पावसाळ्यापूर्वी 27 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर कार्यक्षेत्रात वडवणी, बीड परिसरात चांगला पाऊस झाल्याने बीडचे बिंदुसरा व उपळीचे धरण शंभर टक्के भरलेले आहे, आता काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन्ही धरणांतून उर्वरित येणारे पाणी थेट माजलगाव धरणात समाविष्ट होत आहे तर पैठणच्या नाथसागरचे पाणीदेखील कालव्याद्वारे माजलगाव धरणात दाखल होत आहे, त्यामुळे माजलगाव धरण बाहेरच्या पाण्यावरच 100 टक्के भरले. धरण क्षमता 431.80 दलघमी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा वाजता 1218 क्युसेसने पाणी 2 दरवाजे 0.10 मीटरने उघडून सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रशासनाचे वतीने उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वर्षा मनाळे यांनी बीडसह, परभणी, नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पावसाची आणखी शक्यता असल्याने धरणांत पाण्याची आवक वाढल्यास त्याप्रमाणे उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे धरण अभियंता शेख यांनी सांगितले.

























































