
संसदेतल्या दोन्ही सभागृहांतील 141 खासदारांचं निलंबन हे पूर्वनियोजित असून त्याचा वापर हत्यारासारखा करण्यात आला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केली आहे. सत्ताधारी पक्ष संसदेच्या कार्यशैलीची मोडतोड करत आहे, असं टीकास्त्र खरगे यांनी सोडलं आहे.
संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबाबत आणि खासदारांच्या निलंबनासंदर्भात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी पत्र पाठवलं होतं. सभागृहातील गदारोळ हा जाणूनबुजून केल्याचा आणि ही रणनीती असल्याचा आरोप धनखड यांनी केला होता. त्या पत्राला उत्तर देताना खरगे यांनी उत्तर दिलं आहे.
खरगे आपल्या पत्रात म्हणाले की, जर सरकार सभागृह चालवण्यास उत्सुक नसेल तर सभापतींच्या निवासस्थानी चर्चा करण्यास काही अर्थ नाही. खासदारांचे निलंबन मनमानी पद्धतीने अमलात आणले गेले. सभागृहाचे संरक्षक म्हणून सभापतींनी संसदेत सरकारला जबाबदार धरण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण केलं पाहिजे. सत्ताधारी पक्षाने खासदारांचे निलंबनाचे हत्यार लोकशाहीला कमकुवत करणे, संसदीय कार्यपद्धती मोडीत काढणे आणि राज्यघटनेची गळचेपी करण्याचे सोयीस्कर माध्यम म्हणून वापरले आहे. सभापतींचं पत्र संसदेबद्दल सरकारच्या निरंकुश आणि अहंकारी वृत्तीचे समर्थन करतं. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काही विशेषाधिकार प्रस्तावही शस्त्र म्हणून वापरले जात असतील तर संसदेला कमकुवत करण्यासाठी सत्ताधारी कारभाराची ही जाणीवपूर्वक केलेली रचना आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.
























































