मोदींची ’मुजरा’ शेरेबाजी म्हणजे बिहारचा अपमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी केलेल्या ‘मुजरा’ शेरेबाजीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी सडकून टीका केली असून, ही शेरेबाजी करून मोदी यांनी ‘बिहारचा अपमान केला’ असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते आणि सासाराम लोकसभा जागेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार मनोज कुमार यांच्यासाठी आयोजित निवडणूक सभेत खरगे म्हणाले की, मोदीजींनी हा शब्द वापरून बिहारचा अपमान केला आहे… त्यांच्या म्हणण्याचा अर्थ इथे मुजरा होतो. हा बिहारचा अपमान आहे. एखाद्या पंतप्रधानांनी इतके हीन बोलू नये. त्यांनी राजकीय मुत्सद्याप्रमाणे बोलायला हवे.

आपण मुस्लिमांच्या विरोधात कधीही बोलत नाही असा दावा करणाऱया मोदींनी, इंडिया आघाडीचे नेते मुस्लिम व्होट बँकेसाठी मुजरा करत असल्याचा आरोप शनिवारी एका सभेत केला होता. याबद्दल बोलताना खरगे यांनी मोदींच्या या वक्तव्यावर कडाडून टीका केली.

देशाचे स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही धोक्यात

देशाचे स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही धोक्यात असून पंजाबी समाजाला देशाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा आघाडीवर लढावे लागेल, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. 16 मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यांनी मला 21 मार्चला अटक केली. मोदींचा पराभव केला नाही, तर लोकशाही, संविधान यांचे रक्षण होणार नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला.