सरपंचांचे घर चोरट्यांनी फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

तालुक्यातील तिरवडे गावातील सरपंच विहंग वासुदेव गावडे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. आठवडाभरात घडलेली ही तालुक्यातील तिसरी घटना असून
घरफोडीच्या सत्राने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तिरवडे येथील सरपंच विहंक गावडे बाहेर गेले होते. शनिवारी गावडे हे घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून टाकलेला दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता बेडरूमच्या बेडखाली ठेवलेल्या डब्यातील १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती कट्टा पोलिस दुरक्षेत्रास दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रुक्मांगत मुंडे, स्वप्नील तांबे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बंद घरे, बंगले चोरटे लक्ष करत आहेत. अशा स्थितीत तालुक्यातील आणखी काही बंद घरे चोरट्यांनी फोडली तर नसतील ना. अशी भीती व्यक्त केली जात आहे. तर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.