मालवणच्या डांगमोडे माळरानावर सापडला ‘गोपद्म’ कातळशिल्पाचा अमूल्य ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील कुडोपी गावच्या माळरानावर वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात कातळशिल्प दिसून आली. आता पुन्हा एकदा मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे – मालोंड बेलाचीवाडी या भागातील माळरानावर कातळशिल्प दिसून आली आहेत.

स्थानिक रहिवासी शशांक ठाकूर, विष्णू ठाकूर, स्वप्नील ठाकूर या भावांनी या शिल्पाची माहिती सर्वांसमोर आणली आहे. कातळशिल्प अभ्यासक डॉ. सुधीर रिसबुड यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले कातळावर दिसून येणाऱ्या या सर्व भौमितिक रचना आहेत. पूर्वीच्या काळी त्या नेमक्या कोणत्या कालखंडात काढल्या याचा अभ्यास सुरू आहे.

डांगमोडे माळरानावर दिसून आलेल्या कातळ शिल्प आकाराला स्थानिक बोली भाषेत घोड्याच्या पावलांचा आकार किव्वा गोपद्म म्हणतात. मात्र त्याच्या बाजूला जे खड्डे आहेत ते नेमके काय आहे ? आणखी काही कातळशिल्प तेथे आहेत का ? याचा अभ्यास त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी माहिती डॉ. सुधीर रिसबुड यांनी दिली.

पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून मालवणचा नावलौकिक वाढत आहे. मालवणला मोठी ऐतिहासिक परंपराही आहे. ही परंपरा हजारो वर्षपूर्वीची असल्याचे वेळोवेळी मिळणाऱ्या अमूल्य ठेव्यातून स्पष्ट होत आहे. दिसून आलेल्या या कातळ शिल्प भागांचा विकास करून प्रचार आणि प्रसार झाल्यास हे दुर्गम भाग पर्यटनाचे केंद म्हणून निश्चितच पर्यटन नकाशावर येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

gopadma-katalshilp-1

मालवण तालुक्यातील कुडोपी गावच्या माळरानावर 2001 साली कातळशिल्प दिसून आली. त्यानंतर वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात कातळशिल्प त्या ठिकाणी दिसून आली. त्यावेळी त्याठिकाणी आलेले कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत म्हणाले होते. आपण गेली अनेक वर्षे या कातळशिल्पांचा अभ्यास करत असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे आढळून येतात.

अदभुत अशी ही शिल्पे आहेत. ही कातळशिल्पे नेमकी कोणत्या काळातील आहेत हे अचूकपणे सांगणे कठीण आहे. मात्र आदिमानव काळातील असू शकतात. ‘कुडोपीच्या कातळशिल्पांवर अभ्यास करून आपण रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या कॉन्फरन्स मध्ये सादर केलले संशोधन जगभरात पोहचून कातळशिल्पांची माहिती जागतिक स्तरावर पोहचली. मात्र या कातळशिल्पांचे सखोल सर्व्हेक्षण, संशोधन व संवर्धन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांची माहिती आपल्या लोकांना होणे गरजेचे असून भविष्यात एक आदर्श पर्यटन स्थळ निर्माण झाले पाहिजे, असेही लळीत म्हणाले होते.

याचा विचार करता मसुरे डांगमोडे – मालोंड बेलाचीवाडी भागात दिसून आलेल्या कातळ शिल्पांचे सखोल सर्वेक्षण, संशोधन व संवर्धन झाल्यास याठिकाणी एक पर्यटन स्थळ निश्चितच उदयास येईल. असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

लॉकडाऊनमध्ये शोध आकृत्यांचा

मुंबईत कानानिमित्त राहणारे डांगमोडे येथील शशांक ठाकूर हे लॉकडाऊन मुळे गावी आल्यावर शेतीच्या कामात रमले. तालुक्यातील कातळशिल्पांबाबत माहिती असणाऱ्या शशांक यांनी अशाच प्रकारची शिल्पे आपल्या गावातही असतील का या विचाराने गावातील जुनी जाणती माणसे तसेच माळरानावरील धनगर समाजातील व्यक्तींकडे विचारणा केली.

याबाबत त्यांचे चुलत भाऊ विष्णू ठाकूर यांनी माळरानावरील शिल्पा बाबत माहिती दिली असता त्यांनी त्याची पाहणी केली. त्याची आकृती लक्षात यावी यासाठी शशांक यांनी भाऊ स्वप्नील व विष्णू याच्या समवेत कातळशिल्पवर वाढलेले गवत काढून साफसफाई केली. या शिल्पाचा आकार बदामा सारखा असून आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूला दोन खड्ड्यांसारखी छिद्रेही खोदलेली आहेत.

याच माळरानावर अन्य काही ठिकाणी खोदकाम केलेले खड्डे दिसून आले असून त्याकाळात पाणी साठवणुकीसाठी असे खड्डे खोदले गेले असावेत असा अंदाज शशांक यांनी व्यक्त केला.

‘गोपद्म’ कातळशिल्प

विष्णू ठाकूर म्हणाले, लहान असल्यापासून हे कातळशिल्प पाहत आलो आहोत. मात्र त्या विषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याने एक आकृती म्हणूनच त्याकडे पाहत आलो. या आकृतीला पूर्वज घोड्याचा पाय असे म्हणायचे असेही विष्णू ठाकूर यांनी सांगितले. तर या कातळशिल्पाच्या आकाराची शिल्पे कुडोपी येथेही आढळून येतात.

या आकाराला संशोधकांच्या भाषेत गोपद्म असे म्हटले जाते, डांगमोडेच्या माळरानावर अशाप्रकारचे हे एकच शिल्प सापडले असून अन्य कोणतेही शिल्प सापडून आलेले नाही, मात्र तरीही आजूबाजूच्या परिसरात अशी शिल्पे असण्याची शक्यता आहे, असे शशांक यांनी सांगितले.