स्वाभिमान पक्षाने टक्केवारीसाठी बंद पाडलेले बंदर जेटीचे काम शिवसेनेच्या दणक्यानंतर पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

बंदर जेटीलगत बांधण्यात येणाऱ्या नवीन समांतर जेटीचे काम टक्केवारी साठी बंद पाडण्याचा प्रकार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पदाधिकारी करत आहेत, असा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बंदर विभागाला दणका देत बंद पडलेले काम पुन्हा सुरू केले.

शासन मान्यतेने नियोजित आराखड्याप्रमाणे आणि सर्व परवानग्या घेऊन जेटीचे काम होत आहे. कोणाच्या भीतीने काम बंद करू नये अशी समज शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बंदर अधिकाऱ्यांना दिली.

मालवण बंदर जेटीला समांतर बांधण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम गेले महिनाभर सुरू होते. मात्र काम तीन दिवस बंद राहिल्याने किल्ला होडी व्यावसायिक संघटनेने यावर आक्षेप घेत काम बंद का ठेवले, अशी विचारणा बंदर विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी मालवण बंदर विभाग कार्यालयात धडक देत काम बंद ठेवल्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, उपशहरप्रमुख संमेश परब, किसन मांजरेकर, युवा सेना शहर प्रमुख तपस्वी मयेकर, महेश देसाई, आतु फ्रर्नांडिस, प्रविण रेवंडकर, अक्षय रेवंडकर, श्रेयस रेवंडकर, अक्षय भोसले, चंदु खोबरेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

किल्ला होडी व्यावसायिक व मच्छीमारांच्या दृष्टीने तसेच मालवणच्या पर्यटनाच्या दृष्टीने नवीन जेटी महत्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या जेटीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम. वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. जेटीचे काम शासन मान्यतेने नियोजित आराखड्याप्रमाणे तसेच सर्व परवानग्या घेऊन सुरू केले आहे. त्यामुळे इतर कोणी दाखविलेल्या भीतीमुळे हे काम बंद करू नये अशी समज तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी यावेळी बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर यांना दिली. किल्ला होडी व्यावसायिकांच्या दृष्टीने जेटीचे काम मे महिन्यापर्यंत होणे गरजेचे असून बंद केलेले जेटीचे काम तात्काळ सुरू करावे असेही हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी बंदर निरीक्षकांना सांगितले. शिवसेनेच्या या दणक्यानंतर जेटीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.

विकासकाम होत असताना इतरांनी लुडबुड करून विकासकामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना या कामात आक्षेप वाटत असतील त्यांनी शासनाच्या संबंधित विभागाकडे खुशाल तक्रार करावी. मात्र यापुढे इतर कोणाच्या सांगण्यावरुन काम बंद होऊ देणार नाही. कोणी काम बंद पाडण्यास आल्यास त्यांची गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.