मालवणच्या पर्यटनालाही ‘कोरोना’चा फटका, मासळी व चिकन व्यवसायावरही परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभर थैमान घालणारा कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात 22 रुग्ण आढळले आहेत. हा व्हायरस सर्वत्र पसरू नये यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात असून खबरदारी व जनजागृतीही केली जात आहे. ग्रामीण भागात अद्याप पर्यंत कोरोना पसरला नाही. मात्र सर्वत्रच खबरदारी घेतली जात असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे.

पर्यटन नगरी मालवण येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. मात्र येथील पर्यटनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात पर्यटक अथवा अन्य कोणीही कोरोना संशयित आढळून आला नाही. मात्र सर्वत्र होणारी जनजागृती, मोठ्या संख्येने कोणीही एकत्र येऊ नये या आदेशांचा विचार करता पर्यटकांनीही मालवणकडे पाठ फिरवली असे चित्र आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे पर्यटक किनारपट्टी भागात दिसत आहेत.

दुसरीकडे अफवांचा बाजारही मोठ्या प्रमाणात असून चिकन, मासे यामुळे कोरोना होतो अशा अफवांमुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे. तर मुळातच उत्पादन कमी असलेल्या मासे व्यवसायालाही फटका बसला आहे. ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. गोवा राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक स्कुबा व अन्य वॉटर स्पोर्ट्ससाठी मालवण किनाऱ्यावर येतात. मात्र त्या पर्यटकांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. अशी माहिती पर्यटन व्यवसाईक सतीश आचरेकर यांनी दिली.

कोणीही संशयित नाही तरीही पर्यटक लांब

मालवण तालुक्यात मोठ्या संख्येने परराज्यातील तसेच परदेशी पर्यटक येतात. मात्र कोरोना संशयित कोणीही मालवणात सापडला नाही. काही दिवसंपूर्वी अरब प्रांत व फ्रांस येथून दोघे मालवणात आले होते. खबरदारी म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. एकूणच कोरोना मालवण पासून दूर आहे तरीही पर्यटक सावधगिरी म्हणून पर्यटनापासून चार हात लांब असल्याचे चित्र आहेत.