TMC आमदारांना पक्ष सोडण्यासाठी पोलीस धमकावत आहेत, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सोशल मीडियावर लाईव्ह येत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तुम्ही कितीही ताकद लावली तरी तृणमूल काँग्रेसला फोडता येणार नाही, असे म्हणत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी टीएमसी आमदारांना पोलिसांमार्फत धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की त्या यापुढे पत्रकार परिषद घेणार नाहीत, तर त्यांना जे काही सांगायचे आहे ते सोशल मीडियावर लाईव्ह येऊन सांगतील. याच दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसने ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या आपल्या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

सोशल मीडियावरील लाईव्ह व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूलच्या आमदारांना पोलिसांकडून घाबरवले जात असून त्यांना पक्ष फोडण्यास आणि अमुक एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले जात आहे. हे लोकशाहीचे उदाहरण आहे का, असा सवाल त्यांनी केला. कालच चार आमदारांनी आपल्याला धमकावले जात असल्याचे सांगितले असून त्यांना ईडी आणि सीबीआय अटक करेल, अशी भीती दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काही आमदार आणि खासदारांना पैसे देऊन किंवा धमकावून तृणमूलला कमकुवत करता येणार नाही. तुम्ही काहीही बळजबरी करा, तृणमूल काँग्रेस फुटणार नाही तर अधिक मजबूत होईल आणि बंगालची जनता कधीही झुकणार नाही. बंगाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात विद्यार्थी समुदायाने पुढे येऊन विरोध करावा, कारण विद्यार्थी हे समाजाचा कणा आहेत आणि आम्हीही विद्यार्थी असताना अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवला होता, असे आवाहन त्यांनी केले.