
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अजूनही इंडिया आघाडीचा भाग असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिले. जागावाटबाबात आघाडीत सहभागी पक्षांशी बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ झारखंडमधील गुमला येथे पोहोचली. त्यानंतर बसिया येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, बिहारमध्ये आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचेही राहुल यांनी सांगितले.
देशभरात विकासाच्या नावाखाली सरकार आदिवासींच्या जमिनी बळकावत आहेत. असा घणाघातही राहुल गांधी मोदी सरकारवर केला.
भाजपवाल्यांना कुत्र्यांबद्दल इतके आकर्षण का?
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कुत्र्याला बिस्कीट खायला दिले. त्याचा व्हिडियो मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यासह भाजप नेत्यांनी शेअर करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावर राहुल गांधी यांनी भाजपालाच खोचक शब्दांत प्रश्न केला. भाजपाच्या लोकांना कुत्र्याचे इतके आकर्षण का आहे? कुभ्यांनी त्यांचे काय बिघडवलेय? असा सवाल राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना उद्देशून केला. ती व्यक्ती माझ्याकडे कुत्र्याला घेऊन आली तेव्हा ते कुत्रे घाबरले. ते थरथरत होते, मी त्याला बिस्कीट दिले तर ते घाबरले. मग मी ते बिस्कीट मालकाला दिले. मालकाच्या हातून त्याने ते खाल्ले, मग यात अडचण काय? यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुद्दा येतोच कुठे, असेही राहुल म्हणाले.


























































