घरफोडी करून पळाला; लॅपटॉप विकायला आल्यावर सापडला.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आरे कॉलनीतील जिवाचा पाडा येथे एक घर फोडून आरोपी पळाला. पण वांद्रे रेल्वे स्थानकात चोरलेला लॅपटॉप विकायला तो युनिट-7मध्ये आला आणि आरे पोलिसांच्या हाती लागल्याची घटना नुकतीच घडली.

एक चोर लॅपटॉप विकण्यासाठी आरे कॉलनीतील युनिट-7 येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खोलम, अंमलदार अर्जुन डांगे, शिंदे या पथकाने युनीट-7 परिसरात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार व्यंकट व्हेलमाळी (22) हा तरुण तेथे लॅपटॉप विकण्यासाठी आला. व्यंकट तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याची कसून चौकशी केली असता त्याने जिवाचा पाडा येथे घर फोडल्याची कबुली दिली. तसेच विकण्यासाठी आणलेला लॅपटॉप वांद्रे रेल्वे स्थानकात चोरल्याचेही सांगितले. खोलम यांनी वांद्रेऩ रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्प साधून लॅपटॉप चोरीची माहिती दिली.