पत्नी घर सोडून गेल्याने पतीने स्वत:ला उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उदयपूर

राजस्थानमधील उदयपूर येथे पत्नी भांडण करून घर सोडून गेल्याने तरुणाने पोटावर स्फोटकं बांधून स्वत:ला उडवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. विनोद मीना (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विनोद एका खाणीत दगड फोडण्याचे काम करत होता. त्याला तीन मुलं असून पत्नीबरोबर त्याचे फारसे पटत नव्हते. लहानसहान गोष्टींवरून त्यांच्यात सतत वाद व्हायचा. गेल्या आठवड्यातही त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यामुळे पत्नी घर व मुलांना सोडून निघून गेली. राग शांत झाल्यावर ती परत येईल असे विनोदला वाटले. पण तीनचार दिवस उलटून गेले तरी ती परतली नाही. यामुळे विनोद चिडला होता. त्याच रागात त्याने खाणीत दगड फोडण्यासाठी वापरले जाणारे स्फोटकं गपचूप घरी आणले व पोटावर बांधून त्याचा स्फोट घडवला. यात विनोदचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस विनोदच्या पत्नीचा शोध घेत आहेत.