
सामना ऑनलाईन । बीड
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मी़डियावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीला आंबेडकर समर्थकांनी अमानुष मारहाण केली आहे. महेंद्र निकाळजे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंगळवारी बीडमधल्या अंबाजोगाई येथे त्याला मारहाण करण्यात आली. प्रकाश आंबेडकर समर्थकांनी निकाळजेला मारहाण करून त्याची रस्त्यावरून धिंड काढत त्याला पोलिसांच्या हवाली केले. निकाळजेला मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील यावेळी बनवण्यात आला. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
महेंद्र निकाळजे याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी समाज बांधवांना सोशल मीडियावर आवाहन केले आहे. यासाठी त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आंबेडकर समर्थकांनी निकाळजे याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडून बेदम चोप दिला. एवढेच नाही तर त्याची भर रस्त्यावरून धिंड काढून त्याला अंबाजोगाई शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
गजबजलेल्या परिसरात निकाळजेला तब्बल अर्धा तास जमावाकडून मारहाण सुरू होती. मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. या मारहाणीत महेंद्र निकाळजे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस अधिक तपास करत असून अद्याप कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नाही.
























































