
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या दिल्लीतील घरात बुधवारी एका व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असतानाही हा गंभीर प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरूतील घुसखोराने घराभोवतीचा कठडा तोडून कार आत नेण्याचा प्रयत्न केला. सीआयएसएफच्या जवानांनी त्याला रोखले. नंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.
अजित डोवाल हे दिल्लीतील अत्यंत सुरक्षित क्षेत्र असलेल्या लुटियन्स झोनमधील 5 जनपथ बंगल्यात राहतात. यापूर्वी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल येथे राहत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा बंगलाही डोवाल यांच्या बंगल्याला लागून आहे. बुधवारी सकाळी 7.30च्या सुमारास घुसखोराने या परिसरातील कडेकोट सुरक्षा भेदून डोवाल यांच्या घराचा कठडा तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीआयएसएफच्या जवानांच्या वेळीच निदर्शनास आल्यामुळे पुढील अनर्थ रोखण्यात आला. यावेळी घुसखोराने मला डोवाल यांना भेटायचेय. माझी समस्या तेच सोडवू शकतात, असा कांगावा केला. त्यामुळे गोंधळ उडाला. नंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला अटक करून सखोल चौकशी सुरू केली आहे. ही घटना घडली त्यावेळी डोवाल हे घरीच होते.
’




























































