
सामना प्रतिनिधी । लांजा
लांजा तालुक्यातील व्हेळ गावात जमीन व घराच्या वादातून पुतण्याने काका व काकीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी प्रतीक चंद्रकांत शिगम (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतीक हा त्याचा काका एकनाथ धकटु शिगम (60) व काकी वनिता एकनाथ शिगम (54) यांच्यासोबत एकाच घरात वेगवेगळ्या चुली मांडून राहत होता. प्रतीक व त्याच्या काकाची जमीन व घराच्या मालकी हक्कावरून कायम वाद व्हायचे. शनिवारी सकाळी एकनाथ व वनिता गोठ्यातील कामे उरकून घरात आल्यानंतर पुन्हा त्यांचे प्रतीकसोबत वाद झाले. त्यावेळी प्रतीक व एकनाथ यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर संतापाच्या भरात प्रतीकने जवळील एका दगडाने एकनाथ यांचे डोके ठेचले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तेथे आलेल्या वनिताला त्याने धक्का दिला. या धक्क्यामुळे वनिता जोरात एका दगडावर आपटली. या तिच्या डोक्याला दुखापत होऊन तिचाही मृत्यू झाला.
एकनाथ शिगम आपल्या पत्नी आणि मुली सोबत व्हेळ साडेवाडीत राहत होता. प्रतीक गेल्या वर्षभरापूर्वी मुंबई सोडून गावी आला होता. प्रतीकला दारुचे व्यसन लागले होते त्यामुळे तो अधून मधून या दाम्पत्य सोबत जमीनीवरून वाद घालत असे. प्रतीक शिगम हा दारूच्या नशेत कधीना कधी गावातील लोकांशी देखील वाद घालत असे. शनिवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी पोलिसात कळवले.त्यानंतर काही वेळात लांजा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी प्रतीक शिगम याला ताब्यात घेतले


























































