तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरले; बायको, मेव्हणा, आजेसासूचा खून

बायको कायम माहेरी जाते आणि संसारात तिच्या घरच्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या रागातून जावयाने चुलत भावाच्या साथीने सासरवाडीतील सहाजणांना चाकूने भोसकले. यामध्ये पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री शिर्डीतील सावळीविहीर येथे घडलेल्या भयानक हत्याकांडाने संपूर्ण नगर जिल्हा हादरला आहे. हत्याकांडानंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी जावयासह त्याच्या चुलत भावाला अटक केली.

पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजेसासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45), मेहुणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

आरोपी सुरेश विलास निकम व त्याचा चुलतभाऊ रोशन कैलास निकम (मूळ रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता, हल्ली रा. प्रवरा सर्व्हिस स्टेशनसमोर, संगमनेर खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी नाशिक जिह्यातून ताब्यात घेतले आहे.

शिर्डीजवळील सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये थोडे दिवस सर्व सुरळीत सुरू होते, नंतर दोघांत किरकोळ वाद सुरू झाला. वाद झाला की, वर्षा माहेरी निघून जायची. त्यामुळे सुरेश आणि वर्षा यांच्या संसारात सासू, सासरे, मेव्हणा, मेहुणी यांचा हस्तक्षेप वाढत चालला होता. काही दिवसांपूर्वी वर्षाने पती सुरेशविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून ती माहेरी सावळीविहीर येथे निघून गेली होती. सुरेश याने फोन करून तिला बोलावून घेतले. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. तिला माहेरचे लोकही पाठीशी घालत होते. त्यामुळे सुरेश याचा संताप वाढत गेला. बुधवारी (दि. 20) रात्री सुरेश आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकम हे दोघे दुचाकीवरून सावळीविहीर येथे आले. रात्री 11ः30 ते 12 वाजेच्या सुमारास ते सासरवाडीला पोहोचले. गायकवाड कुटुंबीय झोपले होते. सुरेश निकम याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडताच सुरेश याने जो दिसेल त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. पत्नी वर्षा याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वर्षावरही हल्ला केला. सुरेश याने एकापाठोपाठ एक असे सहाजणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजेसासू हिराबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर मेव्हणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू संगीता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले. चाकूचे वर्मी घाव बसल्याने घरात रक्ताचे थारोळे साचले होते. सर्वजण जखमी झाल्याचे पाहून सुरेश आणि रोशन हे दोघे दुचाकीवरून पसार झाले. हल्ला सुरू असताना आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, योगिता कोकाटे, गणेश काळे, संतोष पगारे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, संदीप चव्हाण, विशाल दळवी, जालिंदर माने, दत्तात्रय हिंगडे, संभाजी कोतकर यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आले. या पथकाने आज पहाटे संगमनेर येथे आरोपींच्या घरी जाऊन माहिती घेतली. मात्र, ते घरी नव्हते. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुरेश विलास निकम व त्याचा चुलतभाऊ रोशन कैलास निकम यांना नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. जखमी मेव्हणी योगिता महेंद्र जाधव हिने दिलेल्या जबाबावरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.