धक्कादायक! पत्नीसोबत भांडणानंतर पतीने नशेत दोन्ही मुलांना दिली फाशी, स्वतःही घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मुलांवर काढत एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांना आधी फाशी दिली आणि स्वतःही गळफास घेतला. उत्तर प्रदेशमधील हरीमपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एकाच घरात दोन लहान मुलं, आणि त्यांच्या वडिलांचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हरीमपूर जिल्ह्यात दोन मुलांचे आणि त्यांच्या वडिलांचे मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलीस तपासादरम्यान मृतकाच्या वडिलांनी (मुलांचे आजोबा) सांगितले की, दारूच्या नशेमध्ये दोन्ही मुलांना फासावर लटकावले गेले आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. प्रियांशु आणि प्राणसी अशी दोन्ही मुलांची नावे आहेत, तर अमर सिंह असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे.

अमर सिंह आणि पत्नी मध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. या वादातून त्यांच्यात भांडणही होत होते. यामुळे कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. यामुळे 35 वर्षीय अमर सिंहला दारूचे व्यसनही लागले होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दोन मुलं आणि त्यांच्या वडिलांचा मृतदेह फासावर लटकलेला होता. कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. हमीरपूरचे एसपी श्लोक कुमार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.