
रवी पाटील नावाचा एक तरुण हाफ चड्डी आणि शर्ट घालून सायकलवर स्वार होत अहमदाबाद इथल्या बँकेत निघाला होता. कमावलेली रक्कम त्याला बँकेत जमा करायची होती. बँकेत शिरण्यापूर्वी त्याची रॅपिड अँटीजेन चाचणी झाली. सगळे सोपस्कार झाल्यानंतर रवी बँकेत शिरला आणि त्याला सुरक्षा रक्षक आडवा आला. त्याने त्याला बँकेबाहेर काढलं. रवीला त्याची चूक काय झाली हे काही सेकंद कळालंच नाही. त्याने सुरक्षा रक्षकाला बाहेर का काढतो? असं विचारलं असता त्याने त्याच्या हाफ चड्डीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं ही घालून बँकेत येऊ शकत नाही. यावरून रवी आणि सुरक्षा रक्षकामध्ये वाद झाला.
दाराबाहेर वाढलेली गर्दी आणि चढ्या आवाजातील बाचाबाची ऐकून बँक मॅनेजर बाहेर आला. त्याने काय झाले असं विचारलं असता सुरक्षा रक्षकाने त्याला सगळा प्रकार सांगितला. मॅनेजरनेही सुरक्षा रक्षकाचं म्हणणं योग्य असल्याचे म्हटत रवीला ‘चड्डी घालून आत येऊ शकत नाही, असले कपडे घालून आत यायला परवानगी नाही’ असे सांगितले. हा प्रकार सोमवारी सकाळी जमलापूर अस्टोडिया इथल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत झाला होता.
रवीने घडल्या प्रकाराबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की मी फिरता लायब्ररीवाला आहे. लोकं मला पुस्तकं दान स्वरुपात देतात आणि मी ती लोकांना मोफत वाचायला देतो. माझ्या अॅपवरून किंवा वेबसाईटवरून ते ही पुस्तकं मागवत असतात. उद्दात्त हेतूने काम करणाऱ्या रवीला बँकेकडून मिळालेली ही वागणूक आवडलेली नाही. त्याने सांगितले की सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास तो बँकेत गेला असताना त्याला सुरक्षा रक्षकाने अडवला, त्यानंतर मॅनेजरही तिथे आला. या दोघांनीही हाफ चड्डी घालून आलो असल्या कारणाने बँकेत प्रवेश नाकारला. रवीचा पोशाख योग्य नसल्याचं बँक मॅनेजरचं म्हणणं होतं, ज्यावर रवीने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्यात यश आलं नाही. लोकांचे कपडे बघून बँकेत प्रवेश द्यायचा अथवा नाही हे बँकेचे धोरण अयोग्य असल्याचे आपण मॅनेजरला सांगितल्याचे रवीने म्हटले आहे.
रवी हा उच्च शिक्षित असून त्याला गेल्यावर्षीही त्याच्या कपड्यांवरून याच बँकेत अशाच प्रकारचा अनुभव आला होता. रवीने म्हटलंय की तो नेटबँकींगचाच वापर करतो, मात्र त्याला रोख रक्कम देण्यात आल्याने तो बँकेत जमा करायला गेला होता. मात्र त्याला हाकलून देण्यात आले. सोबतच त्याच्या हातात खाते बंद करण्याचा फॉर्मही ठेवण्यात आला. संतापलेल्या रवीने तत्काळ घर गाठले, आवश्यक ती कागदपत्रे जमा केली आणि बँक खाते बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. बँकेचे मॅनेजर मनुभाई खत्री यांना घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले रवीने योग्य कपडे घातले नसल्याने त्याला प्रवेश देण्यात आला नाही.
























































