
आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ व कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश रहाणे (वय 58) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आंबेगाव तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी अविनाश रहाणे यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी तालुक्यात काम केले होते. त्यांनी अनेक शिवसैनिकांना शिवसेनेची जोडले होते. त्यांच्या अचानक जाण्याने शिवसेना पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अविनाश रहाणे यांनी शिवसेना शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, असे एकूण 40 वर्ष शिवसेना पक्ष वाढीसाठी काम केले. तसेच पंचायत समिती सदस्य, दोन वेळा आमदारकी लढवली होती. शिवकल्याण पतसंस्थेची स्थापना केली आहे. काही काळ दैनिक सामना व बोभाटा साप्ताहिकाची काम करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले होते. त्यांचे सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. पुणे जिल्ह्यातील अनेक तरुणांचे ते मार्गदर्शक होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती त्यांच्या जाण्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 4 वाजता तपनेश्वर स्मशानभूमी मंचर येथे होणार आहे.


























































