गोव्यात मांडवी पूलाचे उद्घाटन; पूलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

मांडवी नदीवरील तिसऱ्या पूलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय भुपृष्ट व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन करतानाच पुलाचे नाव ‘अटल सेतु’ असे जाहीर केले. आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने उपस्थित थक्क झाले.पर्रिकर यांनी उरी सिनेमामधील हाउ ईज द जोश हा प्रश्न उपस्थित करत भाषणाला सुरुवात करत सर्वांची मने जिंकली.

मांडवीवर उभारण्यात आलेल्या तिसऱ्या पूलाला कुणाचे नाव द्यावे यावरूनही मोठा वादंग झाला होता. पुलाच्या नावावरून राजकारणही सुरू झाले होते. पुलाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाउसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून तर तत्कालीन विरोधीपक्षनेते व ओपिनियन पोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याचीही मागणी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षाकडून केली जात होती. परंतु दोन्ही पर्याय फेटाळून लावून पूलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले.

गोव्यातील मांडवी नदीवरील दोन्ही पुलांच्या मधोमद उंच अंतरावर उभारण्यात अलेला हा साडेपाच किलोमीटर अंतराचा पूल पणजी शहरातील वाहतूक समस्या सोडवणार आहे. या पुलाचे अत्यंत विक्रमी कालावधीत बांधकाम करण्यात आल्यामुळे तो वापरासाठीही लवकरच खुला करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु पंतप्रधान कामात व्यग्र असल्यामुले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. 29 जानेवारीपासून पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.