
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्यवस्थापन महाविद्यालयांमधील १५ टक्के प्रवेश ऑल इंडिया कोट्य़ातून होत असल्यामुळे राज्यातील उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे राज्यातील स्वायत्त दर्जा असलेल्या सर्व व्यवस्थापन महाविद्यालयांमधील १०० टक्के प्रवेश राज्यस्तरावर करावेत, अशी मागणी युवासेनेने राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाकडे केली आहे. ‘एमबीए’, ‘एमएमएस’ अशा व्यवस्थापन अभ्यासक्रम असलेल्या २८ महाविद्यालयात १५ टक्के कोटा ऑल इंडिया स्टुडंटसाठी ठेवल्यास राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. युवासेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांना निवेदन दिले. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, डॉ. सुप्रिया करंडे, मिलिंद साटम, निखिल जाधव, धनराज कोहचाडे, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, ऍड. वैभव थोरात, युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे उपस्थित होते.



























































