
>>मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
परवा सोसायटीच्या पार्कमध्ये सायंकाळी नेहमीप्रमाणे सगळे जमले होते. दिवसभराच्या बातम्या, राजकारण इत्यादींवर चर्चा, वादविवाद चालले होते. तेवढय़ात भोपळेंची एंट्री झाली. ते आले आणि सगळ्या चर्चा थांबल्या. भोपळे कधीकाळी ऑर्केस्ट्रामध्ये गात होते ही माहिती त्यांनीच आम्हाला दिलेली असल्याने ‘‘भोपळे साहेब! छेड दो एक नग्मा!’’ अशी फर्माईश होणे साहजिकच!
‘‘कोणतं म्हणू ब्वा?’’ त्यांनी माझ्याकडे पाहत सल्ला विचारला.
‘‘कोणतंही म्हणा!’’ मी उलट सल्ला दिला आणि त्यांनी त्यांचे पेट्ट गाणे सुरू केले.
‘‘छल्ते छल्ते मेरे ये गीत याद रखणा! कभी अलविदा ना कहणा…’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांचा हुरूप वाढला!
‘‘ये शाम मस्तानी…’’ सुरू झाले. थोडक्यात, मजा आली.
संगीत सगळ्यांनाच प्रिय असते. एखादे गाणे आपणही म्हणावे अशी इच्छा असते, पण धाडस होत नसते. अशा वेळी एखाद्या सुरात आपला सूर मिसळून समाधान करून घेतले जाते. मी किंचीत गाण्यातला असल्याने आणि माझ्या आवाजाच्या ‘पट्टी’ची कल्पना असल्याने एखादे वेळी बेधडक गाणे ठोकून देतो. कुणी हसो की थट्टा करो, मी त्याची तमा बाळगत नाही. एखादा लाजराबुजरा केवळ ‘लोक काय म्हणतील’ या लाजेपोटी आवाज चोरत असेल तर मी एक आयडिया करत असतो. लहान पोरांच्या हाती पांगूळगाडा देऊन त्याला धरल्यासारखे करून नंतर सोडून दिल्यावर तो आनंदाने एकटा तो चालवत पळत सुटतो, तसे या बुजऱया गायकाला एक सूर देऊन सोडले की, तो ‘सुटतो’… मस्त गायला लागतो. नंतर त्याची भीड चेपते आणि गायला लागतो. गायकांमध्येही अनेक जातीजमाती असतात. निव्वळ टेक्निकल गाणारी एक जमात असते. हातात तंबोरा, समोर घडय़ाळ, कुठली तान किती वेळ याचे गणित यांच्या डोक्यात तयार असते. ‘दे दे कंठ कोकिळे मला’ असे नितांत सुंदर गाणे श्रोत्यांसमोर गणित घातल्यासारखे ठेवतात. भावगीतातले भाव वेगळे आणि गीत वेगळे करून त्या गाण्याला ऑपरेशनची कळा आणतात. केवळ सौजन्य म्हणून वाजणाऱया टाळ्या यांचा हुरूप वाढवून जातात आणि मग या गायकाचा बेसूर प्रवास वेग धरतो. नामांकित गायकांच्या अगणित मैफली मी ऐकल्या आहेत, पण त्यातले बोटांवर मोजण्या इतक्या गायक/गायिकांनी त्यांना पुनः पुन्हा ऐकावेसे वाटावे अशी भुरळ घातली आहे. संगीताशी संबंधित कोणतेही वाद्य असो, त्यामध्ये संगीतातल्या औरंगजेबालाही आकर्षित करण्याची नजाकत हवी. तुम्ही गुलाम अलीच्या लाईव्ह मैफली ऐकल्या असतीलच. स्वतः गुलाम अली उत्कृष्ट गायक आहेतच, पण मी जेव्हा त्या गझल ऐकतो तेव्हा माझे चित्त विभागलेले असते. एक गुलाम अलींचे सूर आणि त्यासोबत साथ देणारा टिपेचा तबला ! त्यांचा तबलनवाज कोण ते माहीत नाही, पण विलक्षण गोडवा असणारा साफ हात ! प्रत्येक ठेका हृदयाचे ठोके वाढवणारा. गायक मोठा की साथ देणारा मोठा, असा संभ्रम निर्माण होतो ‘वो मैफिल रंग जमाती है!’ अशा जलसाचे दान पदरात पडायलासुद्धा नशीब लागते.
गाण्यासाठी आवाज चांगला असावा लागतो हे खरे असले तरी हे विधान सापेक्ष आहे. ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरावर एखादी आर्त तान वीज कोसळल्यासारखी येते, तेव्हा तो आवाज कितीही भरडा असला तरी सुंदरच भासतो. पूर्वी पहाटे जात्यावरच्या ओव्या, एकसुरी असल्या तरी त्या प्रसन्न दिवसाची सुरुवात करून द्यायच्या. माझे वडील भलेही गायक नसतील, पण भल्या पहाटे त्यांचं ‘घनश्याम सुंदरा’ मूळ गाण्यापेक्षाही छान वाटायचं. सकाळी आमच्या खेडय़ामध्ये काहीतरी गुणगुणत वासुदेव यायचा तेव्हा खूप बरं वाटायचं. पहाटेच्या भ्रमंतीमध्ये ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आल्हाद देऊन जातो. नदीचा खळखळाट असो की समुद्राची गाज, हे सगळे आपले जीवन संगीत आहे यावर माझी श्रद्धा आहे. आपल्या प्रसन्न, आनंदी जीवनाचे हे स्रोत आहेत.
कुठून सुरुवात झाली आणि कुठे येऊन पोचलो! वाहवत जाणे हा माझा स्थायिभाव आहे. यानिमित्ताने मला
स्वतःशी बोलता येते आणि तुमच्याशीही. बस, अजून काय पाहिजे?






























































