
>> मनीषा म्हैसकर, (प्रधान सचिव-पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग)
आमचे शासकीय काम आता नियमित सुरू झाले आहे. तरीही स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे या गोष्टी आम्ही कार्यालयासाठी बंधनकारक केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांचे बोलायचे तर मंत्रालयाचे कामकाज आपण पूर्णपणे सुरू केलेले आहे. वर्क फ्रॉम होम जवळजवळ संपलेलं आहे आणि आता सगळे जण आपल्या कार्यालयात रुजू झालेले आहेत. हे जरी एकीकडे सुरू असलं तरी दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाच्या केसेस साधारण दुप्पट झाल्या आहेत. या केसेस ऑगस्टच्या शेवटी दर दिवशी एक हजार येत होत्या, त्या आता दोन हजारांच्या वर गेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत काळजी घेणं फार आवश्यक आहे. ऑफिसमध्ये आम्ही शक्यतोवर गोष्टी ऑनलाइन करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या आठवडाभरात आमच्या बऱयाचशा बैठका पर्यावरणाच्या होत्या. त्या सगळ्या बैठका आम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच केल्या आणि त्यामुळे आपल्याला सल्ले मिळतात की, प्रत्यक्ष संपर्क जिथे टाळता येईल तिथे टाळा.
कोरोनाच्या केसेस वाढत असल्यामुळे जिथे आम्हाला ऑनलाइन संवाद साधता येईल तिथे ऑनलाइनच संवाद साधतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडेच ऑनलाइन संवाद साधणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा आम्ही बैठका घेतो तेव्हा आमच्या खोलीच्या खिडक्या उघडय़ा राहतील याची कटाक्षाने काळजी घेतो. कारण चांगलं व्हेंटिलेशन जर असेल तर विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मोकळी हवा खेळत राहील. दुसरं म्हणजे सहा फुटांचे अंतर जिथे शक्य होईल तिथे ठेवतो आणि तिसरे म्हणजे थोडक्यात मीटिंग कशा घेता येतील याचा प्रयत्न करतो, पण एखादे वेळेस असं होऊन जातं की, आपल्याला दुसऱया कार्यालयात जावे लागते. तिथे मोकळी हवा खेळत नसते, गर्दी असते. मग अशा वेळी चांगला मास्क घालणे आवश्यक असते.
कोरोनाच्या या काळात आपण इतरांबरोबर आपली काळजी घेणंही गरजेचे आहे. त्यासाठी घरी आल्यावर दोन गोष्टी आवर्जून करते. एक म्हणजे मीठ आणि हळदीच्या पाण्याच्या गुळण्या करते. दुसरं म्हणजे मास्क सतत घालून नाक कोंडल्यासारखं होतं. त्यामुळे आल्यावर मी गरम पाण्यात काही न घालता त्याची वाफ घेते. काही जण बोलतात वाफ घेणं सर्दीसाठी चांगले असते, पण मला चांगलं वाटतं कारण त्याने नाकाला मास्क लावून लावून नाक कोंदट झालेलं असतं. ते फ्री होतं. दुसरं म्हणजे मला व्यायाम चांगला वाटतो. त्यामुळे मी आणि माझे पती मिलिंद दोघंही 45 मिनिटे ते एक तास चालतो. आहाराबाबतही आम्ही तेवढीच काळजी घेतो. आपला आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे. सकस आहार घेणं गरजेचं आहे. कोणतंही फॅट डाएट करू नये. जसे की काही जण प्रथिनं सोडतात, काही कार्बन सोडतात. असं न करता जे काही आपल्या दोन पिढय़ा पूर्वी जसे संतुलित जेवायचे, बॅलन्स डाएट तसं जेवणं सगळ्यात उत्तम आहे.

























































