मोदी सरकारला ‘पर्याय’ देण्याची वेळ आली आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सर्वच आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्याला ‘पर्याय’ देण्याची वेळ आली आहे, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे व्यक्त केले. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेडस् ऑफ ट्रुथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

मोदी सरकारच्या राजवटीत शेतकरी आणि तरुणवर्ग त्रासून गेला आहे. तर महिला, दलित आणि अल्पसंख्याक समाज हे भयभीत झालेले आहेत, असे डॉ. सिंग यांनी सांगितले. देशातील लाखो तरुण गेली चार वर्षे दोन कोटी नोकऱयांची प्रतीक्षा करीत आहेत. औद्योगिक उत्पादन आणि प्रगती मंदावली आहे, असे सांगून माजी पंतप्रधान म्हणाले की, नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे उद्योगांना फटका बसला आहे. विदेशात दडवलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. त्या सरकारचे परराष्ट्र धोरणही चुकल्यामुळे शेजारच्या राष्ट्रांशी हिंदुस्थानचे संबंध बिघडे आहेत. शैक्षणिक स्वातंत्र्यावर बंधने लादली जात असून विद्यापीठांमधील वातावरण नासवले जात आहे, असा आरोपही डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी केला.