…तर दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद! 12 सप्टेंबरला आंतरवालीत बैठक घेऊन मुंबईकडे कूच करणार; जरांगेंचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा कट सरकारकडून आखला जात आहे. छत्रपती संभाजीनगरात सत्ताधारी मंत्र्यांची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये हे आंदोलन कसे मोडीत काढता येईल यावर सविस्तर चर्चा झाली, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज केला. मुंबईला जाताना अडवाअडवी झाली, कोणाचे रक्त निघाले तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे असे आवाहन करतानाच, 12 सप्टेंबरला आंतरवालीत बैठक घेऊन मुंबईकडे कूच करणार असल्याचा निर्धार जरांगे यांनी केला.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा सोमवारी दहावा दिवस होता. अत्यंत क्षीण आवाजात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याची सरकारची मानसिकताच नाही. सरकारला फक्त कलह करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील, असे दरवेळी सांगितले जाते. प्रत्यक्षात कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यावर मराठवाडय़ातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असे खुद्द फडणवीस यांनीच आपल्याला सांगितले होते, असा दावाही त्यांनी केला.

11 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा

मुंबईत आंदोलन करण्याची वेळ सरकारनेच आणली आहे. 11 सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याची संधी सरकारला आहे. अन्यथा आम्ही मुंबईला धडकणार. मुंबईला जाताना शांततेत जायचे आहे. पोलिसांनी त्रास दिला तरी आपण संयम ठेवायचा. पावनखिंडीत मावळय़ांनी दबा धरला होता, तसाच दबा धरून मुंबईत शिरा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले.

ईडी मागे लावून मराठय़ांना बरबाद केले

मराठा राजकारणी, व्यावसायिकांच्या मागे ईडी लावून त्यांना फडणवीसांनी बरबाद केले. सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांचेही असेच हाल आहेत. असा मग्रूर हिटलरी विचारांचा शासक राज्याला परवडणार नाही असा हल्ला मनोज जरांगे यांनी केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचेही हाल सुरू आहेत. मराठय़ांनी हा कावा ओळखला पाहिजे, असे ते म्हणाले.

अंबादास दानवे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात अन्यथा असंतोषाचा विस्पह्ट होईल, असा इशारा शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी दिला. दानवे यांनी आंतरवाली येथे जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृतीचा विचार करता जरांगे यांनी उपोषण सोडावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

धुळेसोलापूर महामार्गावर पुन्हा रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे राज्य सरकारने कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सोमवारी धुळेसोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वडिगोद्री बाजार समितीसमोरही मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. पोलीस अधिकाऱयांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरील आंदोलन मागे घेतले.