
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टिकेचा मनोज जरांगेंनी शुक्रवारी खरपूस समाचार घेतला असून त्यांना या पुढे असं काही बोललात तर धुवून काढेन, असा सज्जड दम देखील जरांगेंनी नारायण राणेंना दिला.
नारायण राणे यांनी दोन दिवसांपुर्वी ट्विटरवर (X) एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतें की, मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांच्या नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावी!
राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे म्हणाले की, मी नारायण राणे यांना शेवटचं माफ करतो आणि सुट्टी देतो. परंतू, माझं निलेश राणे यांना सांगणं आहे की तुम्ही नारायण राणेंना थांबवा. कारण मलासुद्धा काही मर्यादा आहेत. अन्यथा इथून पुढे मी त्यांना धुवून काढेन, कोणालाही सोडणार नाही. मी माझ्या मर्यादा सांभाळतोय. मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. माझ्या तोंडून नारायण राणेंबद्दल एकही शब्द निघालेला नाही. मी त्यांच्याबद्दल ब्र शब्द उच्चारलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. मग आम्हाला मराठा असल्याचा अभिमान का असू नये.
ते पुढे म्हणाले की, माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे की, तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. मग आता तुम्हाला काय झालंय. मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून बोलायला हवं होतं. तसेच मी तुम्हाला कधी काही बोललो नाही, तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे. उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीनसिंगराव लागून गेलात का? मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. मी माझ्या मर्यादा पाळतोय. मी तुम्हाला आजवर मानत होतो, आताही मानतो, म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. तसेच माझी निलेश राणे यांना विनंती आहे की, नारायण राणे यांना समजावा. कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो.
जरांगे राणेंना उद्देशून म्हणाले की, माझ्यापुढे कोण आहे मी बघणारच नाही. कोण आहे, काय आहे, किती मोठा माणूस आहे असलं काही मी बघणार नाही. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन. मी नारायण राणेंना आतापर्यंत पाच वेळा इशारा दिला आहे. परंतु. ते काही ऐकत नाही. आता मी त्यांना शेवटची संधी देतोय. तेसच मी मुद्दाम निलेश राणे यांना सांगतोय की तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा, उद्या ते काही बोलले तर मी त्यांना सोडणार नाही. त्यांना खेटाचचं असेल तर माझीही तयारी आहे.




























































