जरांगेंच्या सभेसाठी मराठा एकवटला; 123 गावांमधून लोकवर्गणी केली जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी 123 गावांमधून लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही विराट सभा 100 एकर जागेवर होणार असून या विराट सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

निधी संकलनासंबधी आचारसंहिता व नियमावली ठरविण्यात आली असून फक्त 123 गावांतूनच निधी स्वीकारला जाणार आहे. या कामासाठी 5 जणांचे निधी संकलन मंडळ निवडण्यात आले आहे. यात सुदामराव मुकणे, किशोर मरकड, ज्ञानेश्वर उढाण, सचिन मोटे, भाऊसाहेब नाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कुणीही, कुणाकडेही पैसे जमा करू नयेत, अथवा देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

14 ऑक्टोबरला पुढची रणनीती ठरणार

14 ऑक्टोबरच्या सभेत मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरणार आहे. सभेसाठी अनेक गावे पुढे सरसावली असून सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीची जबाबदारी काहींनी घेतली असून गाडय़ांचे पंक्चर, हवा भरणे, गाडय़ांची किरकोळ दुरुस्ती विनामूल्य करून देण्यासाठी परिसरातील मेकॅनिक पुढाकार घेत आहेत. सभेच्या दिवशी येणाऱ्यांसाठी पुऱ्या, दशम्या, शेंगदाण्याची चटणी, ठेचा करण्याची तयारी गावागावात चालू आहे.