24 डिसेंबरनंतर 1 तासही देणार नाही, मराठा आरक्षणावर जरांगे यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या. आम्ही 24 तारखेपर्यंत दिलेल्या वेळेत आता कोणताही बदल होणार नाही. 24 डिसेंबरनंतर एक तासही देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज रविवारी मिंधे सरकारला दिला.

24 डिसेंबरनंतर आंदोलनाची दिशा कशी राहील, याविषयीची भूमिका 23 डिसेंबर रोजी बीड येथे होणाऱया इशारा सभेत जाहीर करणार असल्याचे त्यांनी आज आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात शनिवारी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांनी भेट घेऊन अल्टिमेटमवर विचार करण्याचे आवाहन जरांगे यांना केले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आज थेट आंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक घेतली. यावेळी हजारो समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीत आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करणाऱया सरकारला त्यांनी धारेवर धरले.

ज्यांचे पुरावे, त्यांना आरक्षण द्यावेच लागेल

सापडलेल्या नोंदीवरून तात्काळ प्रमाणपत्र द्या, ग्रामसेवक, तलाठय़ांमार्फत त्या लोकांना सूचना द्या. सरकारने पुन्हा शिंदे समितीला मुदतवाढ देऊन अभ्यासकांची संख्या वाढवावी. मात्र शिंदे समितीला मुदतवाढ दिली तरी आमच्याकडून सरकारला एक दिवसही मुदतवाढ भेटणार नाही. मंत्र्यांनी दिलेले शब्द आम्ही मानतो. मात्र आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी हार मानणार नाही, माघार घेणार नाही. गुलालच घेणार आहे, ताकदीने आणि युक्तीने लढाई सुरू आहे, ती तशीच पुढे ठेवणार. गर्दी जमविण्यासाठी ही सभा नाही, समाजाला न्याय मिळण्यासाठी बैठक घेण्यात आली. विचाराने लढायचे आहे, लढाई ही सोडणार नाही. शांत डोक्याने हा लढा विचारांती लढायचा आहे. हा पहिला आणि शेवटचा लढा आहे.