
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार आज मनोज सौनिक यांनी स्वीकारला. मावळते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सौनिक यांना पदभार दिला. याप्रसंगी विविध विभागांच्या सचिवांनी सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कोलकाता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे.
त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारी, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्राsद्योग, अल्पसंख्याक, गृह, परिवहन असा प्रदीर्घ अनुभव आहे.






























































