जेएनपीटीचे खाजगीकरण नाही – केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडविय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनपीटी आणि देशातील कोणत्याही बंदराचे खाजगीकरण केले जाणार नाही आणि कामगारांच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही धोरण केंद्र सरकार राबविणार नसल्याचे केंद्रीय नौकानयन, रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी स्पष्ट केले. केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते जेएनपीटीचे दास्तान फाट्याजवळील शिवसमर्थ स्मारकातील संग्राहलयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जेएनपीटीच्या दौऱ्यात त्यांनी जेएनपीटीतील पार्कींग प्लाझा, कंटेनर स्कॅनिंग आणि वाय जंक्शन येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर शिवसमर्थ स्मारकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानी बंदरे देशाची संपत्ती असून जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले. मांडविय यांनी संग्राहलायाचे उद्घाटन केल्यानंतर संग्राहलायातील चित्रांचे आणि चित्रकारांचे कौतूक केले. मध्ययुगीन काळातील अजिंठा, वेरूळ लेण्यांप्रमाणे ही चित्रे असून या चित्रांतून शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, आमदार महेश बालदी, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील आणि जेएनपीटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.