प्रतिनिधी । परळी वैजनाथ
मराठा समाजाने आत्तापर्यंत ५८ मूक मोर्चे काढले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव एकवटले मात्र तरीही सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, यामुळे येत्या १८ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी वैजनाथ येथे राज्यव्यापी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने याबाबत दिलेल्या पत्रकातून मोर्चाविषयी माहिती दिली आहे.९ जुलै रोजी हॉटेल अनुसया पॅलेस येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक समितीची आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी, शैक्षणिक सवलतींचा अध्यादेश तात्काळ काढावा, शेतकर्यांना संरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात या प्रमुख मागण्या सरकारकडून लागू करवून घेण्यासाठी या बैठकीत रणनिती आखण्यात आली आहे. सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव तरतूद, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ यासह अन्य काही घोषणा केल्या मात्र त्या निव्वळ फसव्या निघाल्याचा आरोप या समितीच्या पदाधिकार्यांनी केला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे गनिमी कावा पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
परळी वैजनाथ या ठिकाणी ठोक मोर्चा काढून सरकारला जाग्यावर आणण्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्या मान्य करन्यासाठी गनिमी कावा आंदोलन करण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने ठरवण्यात आले आहे. तरी सर्व राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवहान मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

























































