मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष्य; आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना सोनेवाडीत ‘नो एन्ट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे सोनेवाडी हे कोपरगाव तालुक्यातील दुसरे गाव ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेत सकल मराठा समाजाने त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली. तसे निवेदन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला देण्यात आले आहे.

बैठकीत सर्वानुमते गावामध्ये राजकीय पुढार्‍यांना येण्यास बंदी, गावातील कोणत्याही नागरिकांना राजकीय कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय, मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन, आरक्षण वेळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार अदी प्रकारचे निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आले. कालच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय पुढाऱ्यांची मोठी गोची होणार असून त्यांनीही मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुढाकार घ्यायला हवा असे चर्चा यावेळी रंगली. वरील विषयाचे व पुढार्‍यांच्या गाव बंदीचे बॅनर चौकात लावण्यात येणार असल्याची यावेळी जाहीर करण्यात आले.