
मराठी अभिनेते प्रमोद शिंदे यांना उबेर या खासगी टॅक्सी सेवेने प्रवास करत असताना अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. घाटकोपर ते बोरीवली या प्रवासासाठी त्यांनी उबर टॅक्सी बुक केली होती. यावेळी टॅक्सीचालकाने शिंदे यांना क्षुल्लक कारणासाठी धमकी देत त्यांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना मुंबईतील मागाठाणे परिसरात घडली आहे.
बोरीवलीचे रहिवासी असलेले शिंदे हे त्यांच्या 11 वर्षांच्या मुलासह आणि नाटक कंपनीतील 2 सहकाऱ्यांसह घाटकोपरहून बोरिवली इथे जात होते. बोरीवलीमधील शांतीवन भागात टॅक्सी पोहोचल्यानंतर शिंद यांनी टॅक्सीवाल्याला सोसायटीच्या आत गाडी नेण्याची विनंती केली होती. यावर टॅक्सीवाल्याने अरेरावी करत सोसायटीत गाडी नेण्यास नकार दिला होता. यावर शिंदे यांनी टॅक्सीचालकाला तुझ्याविरोधात ऑनलाईन तक्रार करू आणि पैसेही ऑनलाईन देऊ असं म्हटलंय याचा राग आल्याने टॅक्सीवाल्याने त्यांना तुम्हाला पुन्हा घाटकोपरला सोडतं असं म्हणत धोकादायकरित्या गाडी चालवण्यास सुरूवात केली. मागाठाणेच्या पुलापर्यंत आणल्यानंतर चालकाने शिंदे यांना धमकावायला सुरुवात केली. यामुले भेदरलेल्या शिंदे यांनी त्याची माफी मागत पैसे देऊ केले. गाडीतून उतरत असताना शिंदे यांनी गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढला होता. हे टॅक्सी चालकाने पाहिल्यानंतर त्याने शिंदेंच्या हातून मोबाईल हिसकावून घेत तिथून पळ काढला.



























































