
आपल्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय मिळावा, याकरिता प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो, अभ्यास करत असतो आणि त्यातूनच ती भूमिका अधिक बहरते. असेच प्रयत्न सायली संजीव आणि सुव्रत जोशीनेही केले आहेत. शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये सायली संजीवने शिवणकाम करणाऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे, तर सुव्रत जोशीने फुलवाल्याची भूमिका केली आहे. या भूमिकांना न्याय देण्यासाठी सायली- सुव्रतने विशेष मेहनत घेतलीय.
सायली सांगते, चित्रपटात मी शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे, जी आजूबाजूच्या बायकांच्या साडय़ांना फॉल बिडिंग करून देते, ब्लाऊज शिवून देते. अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती, परंतु त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी, त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला. ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, तेल टाकणे या सगळय़ा गोष्टी माहीत असणे गरजचे होते. कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा क्लास लावला होता.
सुव्रत जोशी म्हणाला, फुलवाल्याची गजरे, हार विणण्याची पद्धत, हाताच्या हालचाली या सगळय़ाच गोष्टी आत्मसात करायच्या होत्या. म्हणूनच मी तासन्तास फुलवाल्यांच्या बाजूला उभं राहून त्यांचे निरीक्षण करायचो.