
कोरोनाचा नियोकोव्ह हा नवा व्हेरिएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंढरपुरात दिली. तसेच भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृति स्थिर असून लतादीदी यांना लावण्यात आलेली कृत्रिम श्वसनव्यवस्था काढण्यात आली आहे. त्यामुळे लतादीदी यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री राजेश टोपे पंढरीत येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अंधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.
View this post on Instagram
यावेळी पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, नियोकोव्ह हा नवा व्हेरीएंट चीनमधून आला आहे. याबाबतची जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप माहिती नाही. मात्र या नव्या विषाणूमध्ये मृत्युदर अधिक असल्याचे सांगितले जाते. पण, सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही. तसेच मास्कमुक्ती सध्या राज्यात नाही. सध्या संसर्गाचे प्रमाण कमी आले आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मतानुसार मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोना संसर्गाची लाट संपुष्टात येऊ शकते. तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. टोपे यांनी यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातल्याचे टोपे यांनी सांगितले.
दरम्यान मागील जवळपास दोन वर्षांपासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. भक्तांना दर्शनासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल या प्रश्नावर बोलताना टोपे यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पहात आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे सर्वांच्या दृष्टीने हिताचे आहे. यामुळे भक्तांना माझी विनंती आहे की आणखी थोडे दिवस पदस्पर्श दर्शनासाठी वाट पहावी असे स्पष्ट केले. राज्यभरातील यात्रा, जत्रा देखील याच कारणांमुळे रद्द करण्यात येत आहेत. पुढील महिन्यात पंढरीची माघी वारी असून यास अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य देखील टोपे यांनी केले.
राज्यात 92 टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला असून 65 टक्के पेक्षा अधिक जणांचा दुसरा तर 15 ते 18 वयोगटातील तरूणांचा 60 टक्के डोस झाले आहेत. सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या अधिक असली तरी 95 टक्के रूग्णालयातील खाटा रिक्त आहेत. तर उर्वरित 5 टक्के पैकी केवळ 1 टक्के रूग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर लावण्यात आले असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
पंढरीत 200 खाटांचे रूग्णालय
पंढरीस देशभरातून भाविक हजेरी लावतात. यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयात 200 खाटांचे अत्यंत सुसज्ज सरकारी रूग्णालय उभारणार असल्याचा शब्द देतो असे राजेश टोपे यांनी सांगितले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, इमारत आदी सुविधा तत्परतेने देणारच असे त्यांनी सांगितले. यासह टाटा हॉस्पिटल येथे कॅन्सर रूग्णालय उभे करू इच्छित असून याबाबत आमच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत. याची देखील लवकरात लवकर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन टोपे यांनी दिले.


























































