ऐन मार्चमध्ये तापमानात घट; निफाडचा पारा सात अंशावर

726

दरवर्षी होळीनंतर तापमानात वाढ होत जाते. मात्र, यंदा ईशान्येकडून थंड वारे वाहत असल्याने ऐन मार्च महिन्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी 7.4, तर नाशिक येथे 11.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. जिल्ह्यात आठवडाभरात किमान तापमानाचा पारा 5 ते 7 अंशांनी घसरल्याने थंडी-तापाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.

सध्या वाऱ्याची दिशा बदलली असून, ईशान्येकडून थंड वारे वाहत असल्याने नाशिक व परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे, अशी माहिती हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. 15 ते 17 मार्च या कालावधीत ढगाळ हवामान राहील. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव या भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.

निफाड येथे आज किमान 7.4, तर कमाल 29.1 तापमान नोंदविले गेले, येथे 9 मार्च रोजी किमान 15.2, कमाल 29.5 तापमान होते. नाशिकमध्येही नऊ दिवसात किमान तापमानात पाच अंशांची घट दिसून आली, येथे 9 मार्चला किमान 16.6, कमाल 32.3, तर आज 11.6 व 31.1 तापमानाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या