मार्लेश्वरमध्ये देवांच्या लग्नाच्या तयारीला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरूख

श्री देव मार्लेश्‍वराच्या वार्षिक यात्रोत्सवाला आंगवली मठातून सुरवात झाल्यावर आता मारळमधील सह्यकड्यांवर देवांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. रविवारपासून मारळनगरीत हर हर मार्लेश्‍वरचा नाद घुमू लागला आहे. श्री क्षेत्र मार्लेश्‍वरच्या वार्षिक यात्रोत्सवात 15 जानेवारी हा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी साखरप्याची गिरिजा देवी आणि मार्लेश्‍वराचा विवाह (कल्याणविधी) सोहळा मोठ्या थाटात होणार आहे.

पंरपरेप्रमाणे शेकडो वर्षांपासून सुरू असलेला हा यात्रोत्सव शनिवारपासून आंगवली येथील मार्लेश्‍वराच्या मुळ मठातून सुरू झाला आहे. दिवसभरात शिवपूजा व विविध धार्मिक कार्यक्रम यथासांग करण्यात आले. तर संध्याकाळी दिपोत्सव व देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम झाला. सोमवारी दिवसभरात वांझोळे, आंबव, लांजा येथून कावड व दिंड्या आंगवली येथे आल्यावर रात्री मार्लेश्‍वर विवाह सोहळ्याचे यजमान देवरूखमधील श्री देव वाडेश्‍वर आंगवली मठात दाखल होणार आहेत. त्यानंतर लवाजम्यासह मार्लेश्‍वराची पालखी वाजत गाजत शिखराकडे जाण्यासाठी निघणार आहे. मंगळवारी श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरिजादेवी यांचा कल्याणविधी सोहळा हिंदू धर्मातील लिंगायत शास्त्रीय परंपरांनुसार पंचकलशाची मांडणी करून होणार आहे.

मार्लेश्‍वरप्रमाणे नजीकच्या मठधामापुरातही श्री देव सोमेश्‍वराच्या वार्षिक यात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. या ठिकाणी 11 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांना सुरवात झाली असून येथेही 15 जानेवारी रोजी यात्रोत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्री देव सोमेश्‍वराचा विवाह सोहळा होणार आहे. येथील देवतांचा विवाह सोहळाही लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार होणार आहे. ताम्हाने पंचक्रोशतील 10 गावांसह येथे येणार्‍या भाविकांची सोयीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.