अबब ! कचऱ्यामुळे नशीब फळफळले, सापडला एक कोटीचा खजिना

कोणाचे नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. एका व्यक्तिचे नशीब असेच अनपेक्षितपणे पालटले. कचऱ्यात सापडलेल्या किमती वस्तूंची किंमत जेव्हा या व्यक्तिला कळली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

ब्रिटनमधील केंट येथे राहणाऱ्या मार्टिन (47) या व्यक्तिला लहानपणापासून कचऱ्यातील वस्तू वेचायची सवय होती. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. कचऱ्यामधून ज्या वस्तू सापडतील त्यांची ते विक्री करायचे, मात्र नंतर त्यांनी हे काम व्यवसाय म्हणून स्वीकारले. अलीकडेच मार्टिनला कचऱ्यातून नायके कंपनीचे शूज आणि आयफोनसह अनेक ब्रँडेड वस्तू सापडल्या याशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्यांना सौंदर्य उत्पादनेही सापडली. या सर्व वस्तूंची किंमत कळली तेव्हा मार्टिन यांना आश्चर्यच वाटले. या सर्व वस्तू अतिशय महागड्या असून त्यांची किंमत एक कोटी रुपये आहे. कचऱ्यातून सापडलेल्या या खजिन्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

द सन माध्यमाला मार्टिन यांनी दिलेली माहिती अशी की, ते दर आठवड्याला कचरा वेचण्याच्या व्यवसायातून 20 हजार ते 1 लाख रुपयांची कमाई करतात. त्यांना काही वेळा कचऱ्यातून पुठ्ठा, प्लास्टिक यासारख्या अशा काही वस्तू सापडतात, ज्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. कचऱ्यात सापडलेल्या वस्तू विकून जो मोबदला पैशाच्या स्वरुपात मिळतो त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

मार्टिन कचऱ्यातून वस्तू वेचण्याचे काम करत असले, तरीही त्यांचे मन मोठे आहे. ते म्हणतात की, कचऱ्यात सापडलेल्या बऱ्याचशा मौल्यवान वस्तू ते दान करतात. ज्यांना जास्त वस्तूंची आवश्यकता आहे अशा लोकांना मदत मिळावी, म्हणून कचऱ्यात सापडलेल्या वस्तू दान केल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.