शहिदांना अनोखी मानवंदना! जवानांचे चित्र काढून कुटुंबियांना भेट देणारा चित्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून जयपूर येथील चित्रकार चंद्रप्रकाश गुप्ता अभिमानास्पद काम करत आहेत. चंद्रप्रकाश गुप्ता देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे चित्र काढतात आणि ते चित्र शहिदांच्या कुटुंबीयांना भेट देतात. आतापर्यंत त्यांनी 275 शहिदांचे तैलचित्र काढले आहे. तसेच मैलोन्मैलचा प्रवास करून ती चित्रं शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवली आहेत.

शहिदांच्या कुटुंबीयांचे दुःख कमी करण्यासाठी चंद्रप्रकाश गुप्ता आपल्या परीने प्रयत्न करतात. याविषयी गुप्ता यांनी सांगितले, कारगील युद्धात राजस्थानमधील 85 जवानांनी देशासाठी प्राण अर्पण केले. मला माझ्या जवानांचा अभिमान वाटला, पण त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन कसे करायचे? अवघ्या देशाला या सुपुत्रांचा किती अभिमान वाटतोय, प्रेम वाटतंय हे कुटुंबीयांपर्यंत पोचवायचं होतं. मी चित्रकार असल्याने चित्र काढू शकतो, रंगवू शकतो. म्हणूनच चित्रांच्या माध्यमातून माझ्या भावना शहिदांच्या आप्तजनांपर्यंत पोचवायचा निर्धार केला.

सुरुवातीला कारगील युद्धातील शहिदांचे तैलचित्र काढायचे असे गुप्ता यांनी ठरवले. चौरा रस्ता बाजारातील देविदास स्टुडिओत बसून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी कोटा येथे राहणारे स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांचे चित्र काढले. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात आहुजा शहीद झाले होते. त्यानंतर गुप्ता थांबले नाहीत. त्यांनी आतापर्यंत 275 शहीद जवानांची चित्रे काढली आहेत. त्यामध्ये कारगीलच्या 85 जवानांचा समावेश आहे. शहिदांच्या कुटुंबीयांशी किंवा सैनिक वेल्फेअर डिपार्टमेंटशी संपर्क साधून ते शहिदांचा फोटो मिळवतात. त्या फोटोवरून चित्र काढल्यानंतर ते तैलरंगाने रंगवतात. ती फ्रेम घेऊन गुप्ता स्वतःच्या खर्चाने शहिदांच्या घरी जातात.

तेच खरे बक्षीस

शहिदांची तरुण विधवा, मुले आणि शोकापुल आईवडील मी काढलेले चित्र हातात घेतात, उराशी कवटाळतात. ते दृश्य हृदय हेलावून टाकणारे असते. त्या चित्राकडे बघून कुटुंबीयांच्या चेहऱयावर हलकंसं हास्य उमलतं, ते माझ्यासाठी खरं बक्षीस असतं, असे चंद्रप्रकाश गुप्ता सांगतात.