मारुती सुझुकीने 63 हजार कार परत मागवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार बनविणाऱया सर्वात मोठय़ा ‘मारुती सुझुकी इंडिया’ कंपनीने आपल्या 63 हजार 493 मोटारी परत मागवल्या आहेत. यात सियाझ, एर्टिगा आणि एक्सएल-6 मॉडेलच्या कार्सचा समावेश आहे. 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत बनविण्यात आलेल्या या मॉडेल्सच्या मोटारींमधील काही पार्टस् सदोष आढळल्यानंतर ते बदलण्यासाठी कंपनीने या मोटारी परत घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. यामुळे कंपनीचे शेअर्स एक टक्क्याने घसरून ते 6932 रुपयांवर स्थिरावले आहेत.

या तीनही प्रकारच्या मॉडेलच्या मोटार जनरेटर युनिटमध्ये दोष आढळला असून परत घेण्यात आलेल्या सर्व मोटारींची कसून तपासणी केली जाणार आहे. मोटारींमधील हे विशिष्ट पार्टस् ‘ग्लोबल पार्टस्’ या परदेशी कंपनीकडून आयात करण्यात आले होते. कंपनीने आपल्या या मॉडेल्सची विक्री परदेशांमध्येही केली आहे. त्यामुळे परदेशांमधूनही या प्रकारच्या कार्स परत मागविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कंपनीकडून डीलर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. हिंदुस्थानातील मोटारी परत मागविण्यासाठीही कंपनीने डीलर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.

खराब पार्ट्स बदलून मिळणार
मारुती सुझुकीच्या तीनी प्रकारच्या मॉडेल्सच्या मोटारींमध्ये आढळून आलेले मोटार जनरेटर युनिटमधील बिघाड कंपनीकडून मोफत दुरुस्त करून दिले जाणार असून त्यानंतर त्या त्या ग्राहकाला मोटारी परत केल्या जाणार आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले. मारुती सुझुकीने मोटारी परत घ्यायला शुक्रवारपासूनच सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीच्या डीलर्सची मदत घेतली जाणार आहे.