बुरुडगाव कचरा डेपोला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या बुरुडगाव शिवारातील कचरा डेपोला सोमवारी (दि. 24) पहाटे भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, 12 तास उलटूनही आग आटोक्यात आणण्यात यश आलेले नाही. ही आग विझविण्यासाठी अजून किती कालावधी लागेल याची शाश्वती नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या बुरुडगाव शिवारातील कचरा डेपोला पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आग लागली आहे. पहाटे 1.30च्या सुमारास ही आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या नगर व सावेडी येथील अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी तातडीने रवाना झाले. मात्र, आग मोठी असल्याने एमआयडीसी व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनाही पाचारण करण्यात आले. पहाटेपासून या 4 बंबांमार्फत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात येत आहे. 12 तास उलटूनही दुपारी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेले नव्हते. अग्निशमन दलाच्या बंबांना त्या परिसरात जवळपास पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या वतीने शहराच्या काही भागांना पाणीपुरवठा केले जाणारे 6 टँकर बुरुडगावला पाठविण्यात आले आहेत. या कचरा डेपोत प्लॅस्टिक, कागद, कपडे यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, कचऱयातून निर्माण झालेला गॅस बाहेर पडत असल्याने आग धुमसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येणार नसल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.

महापालिकेच्या सध्या बंद असलेल्या सावेडी कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र, बुरुडगाव शिवारातील कचरा डेपोला प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आग लागलेली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

कचरा पेटविल्याने स्टेट बँक चौकात आग

नगर शहरातील स्टेट बँक चौक येथील स्टेट बँकेशेजारी मोकळ्या जागेत रविवारी (दि. 23) दुपारी प्लॅस्टिक कचरा पेटवल्यामुळे आग पसरली. तेथे असलेल्या 2 मोठय़ा आकाराच्या झाडाच्या वाळलेल्या खोडांनी पेट घेतला. त्याचवेळी तेथून जाणाऱया काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. वेळेत आग विझविल्यामुळे तेथे असलेली इतर मोठी झाडे आगीत होरपळण्यापासून वाचली. त्याचबरोबर आजूबाजूला वाळलेली लाकडे, कचराकुंडी असल्यामुळे ही आग बँकेपर्यंतदेखील पसरण्याची शक्यता होती.