
सामना प्रतिनिधी । कल्याण
पावसाळा सुरू झाला की अतिवृष्टीत नाले, गटारे तुंबून घरात पाणी तर घुसणार नाही ना? याची नागरिकांना धास्ती असते. या वर्षी मात्र कल्याण-डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज आहे. कितीही पाऊस पडला तरी कल्याण-डोंबिवली तुंबणार नाही. पालिकेने तीन महिने आधीच नालेसफाईच्या कामांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. मे महिन्यात प्रत्यक्ष नालेसफाईला सुरुवात केली जाणार असून यासाठी 2 कोटी 35 लाख 55 हजार खर्च येणार आहे. आज स्थायी समितीने प्रभागनिहाय होणाऱ्या कामांना मंजुरी दिली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की किमान दीड महिना कोणताच धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे नालेसफाईची कामे थांबून शहरवासीयांना त्रास होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आताच नालेसफाईच्या कामांची यादी तयार केली. लहान, मध्यम आणि मोठे असे नाल्यांचे वर्गीकरण करून ठेकेदारांना कामे दिली जाणार आहेत.
मजूर संस्थांना कामे
लहान नाले आणि गटारे यांची कामे मजूर सहकारी संस्थांना दिली, तर मोठ्या नाल्यांची सफाई यांत्रिक साधनांच्या सहाय्याने केली जाणार आहे. आज प्राधान्याने प्रभागक्षेत्र 2, 3, 4, 8, 9, 10 येथे कराकयाच्या कामांसाठी 2 कोटी 35 लाख 55 हजार रुपये मंजूर करण्यात आले. सखल भागात पाणी साचणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असल्याचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
































































