अयोध्येनंतर आता मथुरा! कृष्ण जन्मस्थानाजवळची मशीद हटवा! खुद्द भगवान श्रीकृष्णाची न्यायालयात याचिका

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून अयोध्येतील राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. आता मथुरेतील कृष्ण जन्मस्थानाजवळची शाही इदगाड मशीद हटवण्यात यावी आणि हा संपूर्ण 13.37 एकरचा परिसर ताब्यात देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या वतीने करण्यात आली आहे. ही मशीद कृष्ण जन्मभूमीवर बांधण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी असलेले भव्य मंदिर तोडून तेथे मोगलशासक बाबराने मशीद बांधली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याने दिलेल्या अहवालाच्या आधारे याठिकाणी मंदिर बांधण्यास परवानगी दिली. आता कृष्ण जन्मस्थानाचा वादही न्यायालयात गेला आहे. भगवान श्रीकृष्ण विराजमान या नावाने ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यात रंजना अग्निहोत्री यांच्यासह सहा भक्तांना सहयाचिकाकर्ते करण्यात आले आहे. याचिकेत ज्या ठिकाणी शाही इदगाह मशीद बांधण्यात आली आहे, तो कारागृहाचा भाग असून याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता असे म्हटले आहे.

सध्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान सांगितले जाते तेथे पाच हजार वर्षांपूर्वी मथुरेचा राजा कंसाचे कारागृह होते. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर मध्यरात्री याच कारागृहात श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. कटरा केशवदेव नावाने परिचित असलेला हा परिसर भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्याचे इतिहासकार डॉ. वासुदेव शरण अग्रवाल यांचे मत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक पुरावेही दिले आहेत. हेच पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याठिकाणी असलेले भव्य मंदिर मोगलशासक औरंगजेबाने उद्ध्वस्त करून त्याठिकाणी शाही ईदगाह मशीद बांधली.

1968 मध्ये श्री कृष्णभूमी ट्रस्ट आणि शाही ईदगाह कमिटी यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार जमीन ट्रस्टकडे राहणार होती. तर मशिदीचे व्यवस्थापन मुस्लिम कमिटीकडे देण्याचे ठरले होते. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने काशीच्या महाराजांना या जमिनीचे कायदेशीर अधिकार सोपवले होते. त्यानंतर 1951 मध्ये श्री कृष्णजन्मभूमी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. याठिकाणी भव्य श्रीकृष्ण मंदिर बांधण्याचे ठरवण्यात आले. सात वर्षांनी श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघाची स्थापना करण्यात आली. जमिनीचा मालकी हक्क नसतानाही या संस्थेने ट्रस्टच्या जबाबदाऱयांचे निर्वहन केले. याच संस्थेने 1968 मध्ये मुस्लिम पक्षाशी करारही केला.

आपली प्रतिक्रिया द्या