‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मोहीम डिसेंबरमध्ये पुन्हा राबवणार; रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असून ऑक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 63 टक्के इतकी घट झाली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डिसेंबरमध्ये ही मोहीम पुन्हा राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे या मोहिमेची माहिती दिली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे 3 लाख 57 हजार आयएलआय आणि सारीचे रुग्णदेखील आढळले. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 284 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहून आपण अधिक काळजी घेतल्यास व नियम पाळल्यास कोरोनाची लाट रोखू शकू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महत्त्वाकांक्षी अशी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण या मोहिमेद्वारे करण्यात आले. राज्यातील 2 कोटी 76 लाख 33 हजार 982 घरांपैकी 2 कोटी 74 लाख 63 हजार 793 घरांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील 11.92 कोटी लोकसंख्येचे म्हणजेच 99 टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

सर्वेक्षणामुळे सापडले एक लाख रुग्ण

  • घरोघरी सर्वेक्षण केल्यामुळे 1 लाख 15 हजार 481 कोरोना रुग्ण सापडले.
  • कोरोना होण्याआधीच लक्षणांनुसार 2 लाख 39 हजार 473 रुग्णांना बरे करण्यात आले.
  • 3 लाख 57 हजार 173 इली आणि सारीचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 लाख 22 हजार 446 रुग्णांची चाचणी केली असता 51 हजार 64 जणांना कोरोना झाल्याचे दिसून आले.

अन्य आजारांचे रुग्ण

  • मधुमेह 8 लाख 69 हजार 370
  • हायपरटेन्शन 13 लाख 8 हजार 227
  • हृदयविकार 73 हजार 55
  • कर्करोग 17 हजार 843
  • इतर 1 लाख 6 हजार 877
  • एकूण 23 लाख 75 हजार 372