मुंबईत दिवसभरात गोवरचे 22 रुग्ण, कस्तुरबासह विविध रुग्णालयांत 100 बेड सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवरचा वाढता धोका लक्षात घेऊन अतिगंभीर रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कस्तुरबातील विशेष कक्षातील 83 बेडसह महापालिकेच्या कांदिवली आणि गोवंडीतील शताब्दी रुग्णालय आणि  राजावाडी रुग्णालयात बेडची संख्या 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आज दिवसभरात गोवरचे 22 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 164 वर पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत गोवर संशयित रुग्णांची संख्या वाढत असून आज गोवर झालेली 22 मुले सापडल्यामुळे मुलांची एकूण संख्या 164 वर पोहोचली आहे तर मुंबईत सध्या 1079 संशयित रुग्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 2, गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी 10, राजावाडीत 5 तर कस्तुरबा रुग्णालयात 83 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. कस्तुरबामध्ये अतिगंभीर रुग्ण असल्यामुळे 5 व्हेंटिलेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दरम्यान, 4 गंभीर मुलांवर उपचार सुरू असून 4 नोव्हेंबरपासून 29 रुग्ण गोवरमुक्त झाले आहेत.