
ज्ञानेश्वर लंगे । वडवणी
मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फि भरण्यासाठी पैसे नसल्याने साळीबा येथील शितल जाधव हिच्या आईने आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना ऐकल्यानंतर व्यथित झालेल्या आमदार आर. टी. देशमुख यांनी शितलच्या वैद्यकीय शिक्षणाची पूर्ण फि भरली आणि आपला शब्द पूर्ण केला.
शितलच्या आईने आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच माजलगाव मतदार संघाचे आमदार आर. टी. देशमुखांनी साळीबा येथे भेट देऊन जाधव परिवाराचे सांत्वन केले. तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत करत शितलच्या आईचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन दिले होते. ‘शितल, तुझ्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी, तुझ्या ध्येयाला ‘पैसा’ अडसर येणार नाही याची खबरदारी पालक या नात्याने मी घेतो’. अशा शब्द त्यांनी दिला होता.
फि भरण्यासाठी पैसे नसल्याने माझ्या आईने आत्महत्या केली होती. आज स्वतः आमदार आर. टी. देशमुख साहेबांनी माझे व माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेजला येऊन माझी फि भरली. या मदतीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत, अशी प्रतिक्रीया शितल जाधव या विद्यार्थीने व्यक्त केली.































































