
मेरठच्या सरदार वल्लभभाई पटेल कृषी विश्वविद्यालयात तीन दिवसांच्या अखिल भारतीय किसान मेळाव्यात तब्बल 10 कोटी किंमत असलेला गोलू टू हा रेडा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. हरियाणातील पद्मश्री सन्मानित शेतकरी नरेंद्र सिंह आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण रेड्याला आणले आहे. सध्या तो येथे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गोलू टू या रेड्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
या रेड्याचे नाव गोलू टू ठेवण्यात आले आहे. याचे आजोबांचे नाव गोलू वन होते. हा रेडा गोलू वनपेक्षाही जबरदस्त असल्याने याचे नाव गोलू टू ठेवण्यात आल्याचे नरेंद्र सिंह यांनी सांगितले. हा रेडा शुद्ध मुर्रा प्रजातीचा असून याची आई दररोज 26 किलो दूध देत असल्याचेही सिंह यांनी सांगितले. या रेड्याचे वन तब्बल 1500 किलो आहे. त्याचे वय 4वर्षे 6 महिने आहे. हा दररोज 30 किलो सुका चारा खातो. तसेच 7 किलो गहू-चणे आणि 50 ग्र२म मिनरल मिक्चर घेतो. याचा दिवसाचा खर्च एक हजार रुपये आहे. याच्या वीर्यापासून चांगली कमाई होत असल्याचे सिंह यांनी सांगितले.
गोलू टू या रेड्याची किंमत 10 कोटी असली तरी आपण याला विकणार नसल्याचे नरेंद्र सिंह यांनी सांगितले. या मेळ्याव्यात येणाऱ्या प्रत्येकाचे गोलू टू आकर्षण ठरत आहे. अनेकजण येथे गोलू टू ची चौकशी करत आहेत. आपल्याला देशी जनावरांची आवड असून आपण त्यांचे चांगले संगोपन करत असल्याचेही सिंह म्हणाले. याआधी आपण गोलू वनवर मेहनत घेतल्याचेही सिंह यांनी सांगितले. आता गोलू टू आकर्षणाचे केंद्र ठरत असल्याचा अभिमान असल्याचेही सिंह म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच गोलू वनचा मृत्यू झाल्याचे सिंह यांनी सांगितले. त्याला आपण ठिकठिकाणी नेले. त्याच्या वीर्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. गोलू वनपासून आपण पीसी 483 तयार केला होता. तो गोलू 2 चे वडिल असल्याचे सिंह यांनी सांगितले. तो रेडा आपण हरियाणा सरकारला रेड्यांच्या प्रजातीत सुधारणा होण्यासाठी भेट म्हणून दिल्याचे सांगितले. आता गोलू 2 च्या मदतीने आपण रेड्यांची प्रजाती सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कितीही किंमत मिळाली तरी हा विकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपण गोलू 2 कोठेही नेले तरी त्याच्यासाठी पाण्याच्या एका टँकरची व्यवस्था करतो. त्याला उष्णता सहन होत नसल्याचे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते, असे सिंह यांनी सांगितले. या मेळाव्यात गोलू टू ला आणून शेतकऱ्यांमध्ये या प्रजातीबाबत जागरुकता निर्माण करत प्रजाती सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. याच्या वीर्याचा योग्य वापर करत चांगल्या दर्जाच्या म्हशी आणि रेडे तयार करता येतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या या प्रयत्नांची दखल घेत सरकारने 2019 मध्ये आपल्याला पद्मश्री सन्मान दिल्याचेही त्यांनी सांगितले.



























































